आजिवली येथे वृध्द वडिलांना मुलाने केली मारहाण

राजापूर:- राजापूर तालुक्यातील आजिवली, फौजदारवाडी येथे एका मुलाने आपल्या ८४ वर्षीय वडिलांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण करून कॉटवर बसलेल्या वडिलांच्या डोक्यात प्लास्टिकची खुर्ची मारून त्यांना जखमी केल्याप्रकरणी मुलावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सदाशिव पवार (वय-८४, व्यवसाय-शेती, रा. आजिवली फौजदारवाडी, ता. राजापूर) यांनी राजापूर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. २८ मे रोजी रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरी जेवण करून कॉटवर बसले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा, आरोपी समीर हनुमंत पवार (वय-३५, रा. आजिवली, फौजदारवाडी, ता. राजापूर) हा त्याची आई आणि फिर्यादीची पत्नी संजिवनी हिला शिवीगाळ करत होता.

यावर फिर्यादी हनुमंत पवार यांनी समीरला जाब विचारला असता, समीरला राग अनावर झाला. त्याने कॉटजवळ असलेली प्लास्टिकची खुर्ची उचलून वडिलांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारून त्यांना दुखापत केली.

या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी २९ मे रोजी दुपारी ४.०० वाजता राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गु.र.नं. १०४/२०२५ भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.