आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणी संशयितास दोन दिवसांची पोलीस कोठडी

रत्नागिरी:- अयोध्या राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडीयावर धार्मिक भावना दुखावणारे स्टेटस ठेवणार्‍या संशयिताला शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री 7 वा.अटक केली.बुधवारी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

सलमान जमिर मुजावर (22,रा.म्हाडा कॉलनी क्रांतीनगर,रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्या विरोधात चंद्रकांत श्रीधर राउळ (47,रा.खेडशी,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,संशयित सलमानने इन्स्टाग्रामवर बाबरी मशीद,टिपू सुलतानच्या फोटोसहीत धार्मिक भावना दुखावणार्‍या 4 पोस्ट केल्या.त्याने धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 153(अ),505(2),295(अ) अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.बुधवार त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली.

दरम्यान,या राजापूर,दापोली आणि रत्नागिरीतील या सर्व प्रकारानंतर पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नागरिकांना सोशल मिडियाव्दारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र,पोस्ट,अफवा,चुकीचे संदेश अगर व्हिडिओ प्रसारित करु नये.सर्व जातिच्या धर्मांच्या आक्षेपार्ह घटनांवर कठोर कारवाई करण्यात येणार व अश्या घटनांवर रत्नागिरी पोलिस दलातर्फे कडक धोरण स्विकारले जाईल.तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.