आईचा खून करणाऱ्या नराधम मुलाला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी

देवरुख:- देवरुख क्रांतीनगर येथे वृद्ध आईच्या खून प्रकरणी मुलाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. दीपक दत्तात्रय संसारे अस त्याच नाव आहे. मंगळवार 14 रोजी त्याची पोलिस कोठडी संपल्याने बुधवार 15 नोव्हेंबर रोजी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

  प्रकरण असे की, देवरुख शहरातील क्रांतीनगर येथे अपार्टमेंटमध्ये शारदा दत्तात्रय संसारे व दीपक दत्तात्रय संसारे राहत होते. शारदा दत्तात्रय संसारे यांचा खून झाल्याची घटना 31  ऑक्टोबर रोजी घडली होती. त्यांचा खून करून मृतदेह टेरेसवरील पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. या बाबत दीपक संसारे याने देवरुख पोलीस ठाण्यात खबर दिली. दिवसभर आईचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. रात्री 8 वा. दीपक हातपाय धुण्यासाठी नळावर गेला असता नळाला लाल रंगाचे पाणी आले. यावेळी टेरेसवरील टाकीची पाहणी केली असता आईचा मृतदेह दिसून आल्याचे फिर्यादीत नमूद केले. मात्र हा खून कोणी केला? का केला या बाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. 

 पोलीस यंत्रनेने देवरुख बाजारपेठेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. चोरी करणारे चोरटे दागिने, रोख रक्कम घेऊन धूम ठोकतात. त्यांच्याकडे कालावधी कमी असतो. मात्र शारदा संसारे यांचा खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला होता. यावरून हा खून दागिन्यांसाठी झाला नसावा, असा पोलीस यंत्रणेचा अंदाज आहे. पोलीस कोठडीतील तपासा दरम्यान दीपकने देखील आपण आईचा खून केला नसल्याचे सांगितले आहे. यामुळे पोलीस यंत्रणा संभ्रमात आहे. तपासादरम्यान काहींचे जबाब घेण्यात आले आहेत. आई व पत्नी यांच्यात वारंवार वाद होत होते. या वादाला कंटाळून दीपकने आईचा खून केल्याचा पोलिसाना संशय होता. 

या घटनेचा पर्दाफाश करण्यासाठी श्वान पथक, ठसेतज्ञ, फॉरेन्सिक लॅबची व्हॅन व वरीष्ठ अधिकारी दोन तीन दिवस देवरुखात ठाण मांडून होते. मुलगा दीपक याने दिलेली फिर्याद व पीएम रिपोर्टमध्ये तफावत असल्याने या खून प्रकरणी देवरुख पोलिसांनी चक्क शारदा संसारे यांचा मुलगा दीपक संसारे यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतले. 

दीपक याला अटक करून देवरुख न्यायालयात हजार करण्यात आले असता न्यायाधीशांनी एकूण 13 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ही कोठडी बुधवारी संपल्याने दीपकला पुन्हा देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी दीपकला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.