आंबा घाटात रस्त्यावर पुन्हा दगड, माती

रत्नागिरी:- आंबा घाटातील रस्त्यावर माती येण्याचे प्रकार अधूनमधून होत आहेत. शनिवारी (ता. 14) दुपारी अचानक दगड, माती खाली आल्यानंतर काम करण्यासाठी रत्नागिरी-कोल्हापूरकडून येणारी वाहतूक दोन तासाहून अधिक काळ थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या.

जुलै महिन्यातील अतिवृष्टीत रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात बारा ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. डोंगरातून येणार्‍या पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्याने रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला. सुमार बारा दिवस याठिकाणी काम केल्यानंतर हा मार्ग हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला; परंतु घाटमाथ्यावर हलक्या पावसाच्या सरी पडत आहे. घाटातील भाग पावसामुळे कमकुवत झालेला आहे. अधूनमधून रस्त्याच्या बाजूला माती खाली येत असते. शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक माती रस्त्यावर आली होती. बांधकाम विभागाकडून ती माती काढण्याचे काम तत्काळ सुरु करण्यात आले. मशिन सुरु असल्यामुळे वाहतूक सुरु ठेवणे अशक्य होते. काम करताना डोंगरातून दगड घरंगळत येत असल्याने वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी सायंकाळी वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. कोरोनातील परिस्थिती निवळत असल्याने पुणे, कोल्हापूरकडून येणार्‍या छोट्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी घाटातील दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. घाटात धुके असल्यामुळे काम करण्यातही कामगारांना अनेक अडचणी येत असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. सायंकाळनंतर घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.