आंबा खरेदीसाठी आणलेली १२ लाख ६५ हजारांची रोकड लंपास करणारा चोरटा गजाआड  

रत्नागिरी:- आंबा खरेदीसाठी आणलेली १२ लाख ६५ हजारांची रक्कम लंपास करणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी २४ तासात गजाआड केले आहे. चोरट्याने चोरलेली सर्व रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

फिर्यादी  नौशाद महामुद शेकासन (वय ५६ वर्षे, रा. राहत अपार्टमेंट, रत्नागिरी शहर) यांचा आंबा खरेदीचा व्यवसाय असुन, ते कात्रादेवी, ता. राजापुर येथे तंबु मारुन आंबा खरेदी व त्याचे लोड करीता एकुण ९ कामगारांसह तंबुत रहात होते. आंबा खरेदीसाठी आणलेली रोख रक्कम १२  लाख ६५  हजार २४० रुपये त्यांनी त्यांचे जवळ काळया बॅगेत ठेवले होते.

दिनांक १० मे रोजी  रात्री १० ते ११ मे रोजी  मध्यरात्री १२.४३ वा.चे मुदतीत ते सदर रोख रक्कम १२ लाख ६५ हजार २४०/- रुपये असलेली बॅग ते आपल्या डोक्याखाली ठेवुन झोपलेले असताना, कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदरची रक्कम असलेली बॅग चोरुन नेली. याप्रकरणी फिर्यादी नौशाद महामुद शेकासन यांनी नाटे पोलीस ठाण्यात  तक्रार दिली.

या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहित कुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक  जयश्री देसाई  तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा  श्रीनिवास साळोखे यांनी सागरी पोलीस ठाणे नाटे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक  आबासाहेब पाटील यांना गुन्हे तपासकामी मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या होत्या. त्यावरुन सागरी पोलीस ठाणे नाटे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांचे करवी तपास चालु होता.

सदर पथक कात्रादेवी, ता. राजापुर येथे तंबु मारुन फिर्यादी हे आंबा खरेदी करीत असलेल्या परिसरात अज्ञात आरोपीत याचेबाबत माहीती घेत असताना कात्रादेवी चौक येथील “ऑपरेशन नेत्रा” अंतर्गत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न झाला. त्यावरुन सदर संशयित इसम रेहान बाबामियाँ मस्तान (वय ३४ वर्षे , रा. मिरकरवाडा याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली रोकड १२ लाख ६५ हजार २४० रुपये हस्तगत करण्यात आली आहे.