उन्हाचा परिणाम; पाऊस पडल्यास कुजण्याची शक्यता
रत्नागिरी:- मागील आठ दिवसात अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसा कडकडीत उन पडत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर दिसू लागला आहे. रत्नागिरी तालुक्यातील काही कलमांना पालवी फुटण्याची शक्यता आहे. त्यावर पाऊस झाला तर पालवी कुजून जाईल आणि भविष्यात पालवीसाठी बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागेल. ही पालवी आंबा उत्पादनावर परिणामकारक ठरु शकते.
जिल्ह्यात 28 ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरला. दररोज सरासरी 10 मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद होत आहे. दिवसातून एखादी पावसाची सर पडत आहे. दिवसा पडणार्या कडकडीत उन्हामुळे उष्माही वाढलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पाऊस कमी झाला आहे. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाने सरासरी गाठली; परंतु सप्टेंबरच्या सुरवातीला पावसाने विश्रांती घेतली होती. कडकडीत उन्हामुळे जमिनही तापली असून त्याचा परिणाम आंबा कलमांवर दिसू लागला आहे. गेल्या दोन दिवसात काही झाडांवर पालवी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फांदीला कोंब आलेले असून वातावरण असेच राहिल्यास पूर्णतः पालवी येईल. पण पाऊस सुरु झाला तर मात्र फांदीला आलेले कोंब किडींच्या प्रादुर्भावामुळे कुजून जातील असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे.
उन्हाचा ताप वढल्यामुळे हे चित्र रत्नागिरी तालुक्यात काही ठिकाणी दिसत आहे. ही पालवी ऑक्टोबर महिन्यात दिसते. यंदा एक महिना आधीच पालवी येण्यास सुरवात झाली आहे. एखादा बागायतदाराने त्यावर फवारणी केली तर त्यातून उत्पादन येऊ शकते. या झाडांना फेब्रुवारी महिन्यात आंबे लागतील. हवामान विभागाकडूनही गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. रविवारी (ता. 6) रात्री हलक्या सरीही पडल्या होत्या. जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळी हंगामाचे आहेत. दरवर्षी हवामानातील बदलांमुळे आंबा कलमांवर विविध बदल दिसून येतात. त्याचे परिणाम भविष्यातील आंबा उत्पादनावर होतात. ही गोष्ट लक्षात घेऊन बागायतदारांनाही पिकांचे नियोजन करावे लागते. सध्याच्या स्थितीत आलेली पालवी जपण्याच्या मानसिकतेत आंबा बागायतदार दिसत नाहीत.









