आंतरराष्ट्रीय कॉलिंग प्रकरणातील आरोपींची सशर्त जामिनावर मुक्तता

रत्नागिरी:- स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी रत्नागिरी शहरात बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश पोलिसांनी केला होता. मुंबई एटीएसच्या माहितीवरून रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई केली होती. या कॉल सेंटरवरून परदेशात बेकायदेशीरपणे कॉल करण्यात आले असे पोलिसांचे म्हणणे होते. या सेंटरचा वापर परदेशात देशविरोधी कारवायांसाठी केला जात आहे काय ? याची देखील पोलिसांकडून तपासणी होत होती. सेंटरचे सर्व साहित्य जप्त करून शहरातील मोबाईल शॉपीच्या मालकासह पनवेल येथून एकाला अटक करण्यात आली होती.
 

बेकायदेशीर आंतराष्ट्रीय कॉल आणि शासनाचा महसूल बुडवणे या दोन्ही गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून श्रीटेकचे मालक अलंकार विचारे (रा. छत्रपती नगर) आणि फैसल रजा अली रजा सिद्दीकी (रा. पनवेल) यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी संशयित आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता आरोपींतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की या प्रकरणी कोणतेही संशयास्पद किंवा दहशतवादी कृत्य करण्यात आले नाही आणि नव्हते. शासनाचा कोणताही महसूल आरोपीनी बुडावलेला नाही. न्यायालयात आरोपींतर्फे सदर सिस्टीमचे आणि सिप ट्रंक चे जिओ चे अधिकृत बिल आणि बिल भरणा पावती हजर करण्यात आली. 

न्यायालयाने आरोपीची प्रत्येकी 15000 रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. आरोपीना दर आठवड्याचे दर गुरुवारी पोलीस स्टेशनला हजर राहण्याची व पुराव्याशी छेडछाड न करण्याची अट घालण्याच्या अटीवर जामिनावर मुक्त करण्यात आले. प्रमुख आरोपी फैसल रजा अली रजा सिद्दीकी यांच्यातर्फे ऍड. संकेत घाग तर आरोपी अलंकार विचारे यांच्यातर्फे ऍड. भाऊ शेट्ये यांनी काम पाहिले.