लांजा पोलिसांत गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील आंजणारी येथील शिखरे वाडीत अज्ञात चोरट्याने कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे ५ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंजणारी शिखरेवाडी येथील रहिवासी शुभांगी यशवंत शिखरे यांच्या घरात हा चोरीचा प्रकार घडला. शुभांगी शिखरे यांच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने दि. १२ मे ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही चोरी उघडकीस आल्यानंतर दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी लांजा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्याने नेलेल्या दागिन्यांमध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे: २५ ग्रॅम ६० मिली वजनाचे मंगळसूत्र, १५ ग्रॅम ५२० मिली वजनाचा हार, ६ ग्रॅम वजनाची कानातील कर्णफुले व ३ ग्रॅम ८० मिली वजनाची कान साखळी,२ ग्रॅम ५०० मिली वजनाची लेडीज अंगठी, ३ ग्रॅम १०० मिली वजनाची जेंट्स अंगठी अशाप्रकारे एकूण ५,४५,००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कांबळे हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.