अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणाऱ्या संशयिताला जामीन

रत्नागिरी:– रत्नागिरीतील १७ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्या संशयिताची न्यायालयाने ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. रामदास मनोहर शिंदे उर्फ प्रेम तांडेल (२७, रा. देहूरोड पुणे) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध शहर पोलिसांकडून भादंवि कलम ३७६ व पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी व पीडित मुलगी यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये समाजमाध्यमावर ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांची एका ठिकाणी भेट झाली आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर दोघेही आपआपल्या घरी निघून गेले. या घटनेनंतर पीडितेने संशयिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. दरम्यान यानंतर पीडितेला दिवस गेल्यानंतर पुन्हा तिने ही बाब संशयित आरोपीला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद आरोपीने दिला नाही. दरम्यान ५ महिने उलटून गेल्यानंतर एप्रिल २०२४ मध्ये पीडितेने संशयिताविरुद्ध रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपी रामदास शिंदेविरूद्ध भादंवि कलम ३७६ व पीडिता ही अल्पवयीन असल्याने आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) चे कलम ४, ६, ८, १२ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली. आरोपीने आपल्याला जामीन मिळावा, यासाठी न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने संशयित आरोपीची ५० हजारांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली. रत्नागिरी सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी हा निकाल दिला.