रत्नागिरी:- शहरातील १५ वर्षीय मुलीवर मातृत्व लादणाऱ्याला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व ३० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. सैफू सय्यद शेख (३३. रा. शेट्येनगर रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध रत्नागिरी शहर पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र व विशेष पॉक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला आबासाहेब राऊत यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाकडून ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले.
खटल्यातील माहितीनुसार आरोपी व पिडीत मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. आरोपी याने पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवून सप्टेंबर २०१८ मध्ये तिच्याशी शरिरसंबंध निर्माण केले. दरम्यान काही दिवसांनी पिडीतेला त्रास जाणवू लागल्याने तिला उपचारासाठी खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी पिडीता ही गर्भवती असल्याची माहिती समोर आली.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी याच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यासह सरकार पक्षाकडून एकूण १९ साक्षिदार न्यायालयापुढे तपासण्यात आले. वैद्यकीय पुरावा (डीएनए रिपोर्ट) जुळल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली.
न्यायालयाने आरोपी याला भादंवि कलम ३७६ (३) नुसार २० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रूपये दंड, पॉक्सो ॲक्ट नुसार ३ (ऐ) सह ४ अन्वये ७ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रूपये दंड व पॉक्सो ॲक्ट ५ (जे) रिह विथ ६ नुसार १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.