अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणाऱ्याला वीस वर्ष सक्तमजुरीची शिक्षा 

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील एका गावात जवळच्या नात्यातीलच १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरी करणार्‍या तरुणाला पोक्सो विशेष न्यायालयाने शुक्रवारी २० वर्षे सक्तमजुरी आणि ४३ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.ही घटना जलुै २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडलेली आहे.

अनुराग मोतीराम बावकर (३०,रा.राजापूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पिडीतेच्या मावशीने दिलेल्या तक्रारीनुसार,पिडीतेच्या आई-वडिलांचा मृत्यू झालेला असल्यामुळे ती वडिलांच्या आईकडे म्हणजेच आजीकडे राहते.आजी बाहेर गेल्यावर अनुराग पिडीतेवर कुणाला सांगितलेस तर तुझे नाव खराब करीन अशी धमकी देत तिच्यावर वारंवार बळजबरी करत होता.याबाबत पिडीतेने आपल्या आजीकडे तक्रार करुनही तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते.दरम्यान,पिडीता मुंबईला आपल्या मावशीकडे गेली होती.तिथून ती परत गावी परतण्यास तयार नव्हती.तेव्हा मावशीने तिच्याकडे याबाबत विचारणा केली असता तिने रडण्यास सुरुवात करुन सर्व हकिकत सांगितली.मावशीने याबाबत मुंबई येथील मालवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.परंतू घटना राजापूर येथे घडल्याने गुन्हा राजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.तत्पूर्वी मुंबईत पिडीतेची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली होती.

गुन्हा राजापूर पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एल.मौले यांनी तपासाअंती अनुराग बावकर आणि गुन्ह्याचे कृत्य माहित असूनही पोलिसांकडे तक्रार न दिल्यामुळे पिडीतेच्या आजी विरोधात पोक्सो विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.पुष्पराज शेट्ये यांनी १० तर आरोपीच्या वतीने ३ साक्षिदार तपासण्यात आले.दोन्ही पक्षांच्या युक्तीवादाअंती अनुरागचा गुन्हा साबित झाल्याने विशेष न्यायाधीश वैजयंतीमाला ए.राउत यांनी भादंवि कलम ३७६ (२) (एन),(ए)(बी), ३५४, ३५४-ए, ३७७, ५०६,तसेच पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून २० वर्ष सक्तमजुरी आणि ४३ हजार ५०० रुपये दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली.तसेच पिडीतेच्या आजीला हे कृत्य माहित असूनही तिने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिला भादंवि कलम २०२ अन्वये पोक्सो कायदा कलम १९ (१) सह २१ प्रमाणे दोषी ठरवून १ हजार रुपये दंड तो न भरल्यास १० दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.