रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करणाऱ्या तरुणाविरोधात पूर्णगड पोलिस स्थानकात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मे ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे . ओंकार ऊर्फ बबलू रामचंद्र नैकर ( वय २२ , रा . पावस नालेवठार , रत्नागिरी ) असे तरुणाचे नाव आहे . त्याच्या विरोधात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार , संशयिताचे त्यांच्या घरी येणे – जाणे होते . २०२३ मध्ये शाळेला सुटी असताना ती पावस येथील एका फॅक्टरीत कामाला जायची . सायंकाळी ७ वाजता ती कामावरून घरी जात असताना संशयिताने पावस बाजारपेठेत दुचाकीवरून तिच्या मागून जाऊन तिला थांबवले . लांजा येथे माझी वहिनी आजारी असून आपण तिला बघायला जाऊया , असे त्याने पीडितेला सांगितले . त्यावर तिने मी आईला विचारते , असे सांगितल्यावर संशयिताने मी तुझ्या आईला सांगतो , तू त्याची काळजी करू नकोस , असे सांगितले . त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडिता त्याच्यासोबत लांजा येथे गेली असता तेथील एका बंद घरात त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला . तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली . त्यानंतरही ओंकार नैकर हा पीडितेला ती घरी जात असताना तिला वाटेत वारंवार थांबवायचा , ठार मारण्याची धमकी देऊन गोळप येथील एका घराच्या मागील खोलीत तिच्यावर अतिप्रसंग करायचा . दरम्यान , ३१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता तो पीडितेला घेऊन गोळप येथे गेला होता . त्यानंतर त्याने १ सप्टेंबर रोजी पीडितेला तिच्या घरी सोडले असता तिला अस्वस्थ वाटू लागले .









