खेड:- मंडणगड तालुक्यातील बाणकोट सागरी पोलिस ठाण्यात अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 23 जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर संशयित शिक्षक निलेश अशोक कांबळे यांनी मोबाईल चार्जरच्या कारणावरून दोन विद्यार्थिनींना घरी बोलावले. त्यापैकी एका विद्यार्थिनीला दुकानात पाठवून दुसर्या मुलीला हॉलमध्ये नेऊन तिचा हात धरून अश्लील प्रकार केला. घाबरलेल्या मुलीने घरी गेल्यावर नातेवाईकांना याची माहिती दिली. पालकांनी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, गावातील काही जणांनी दबाव आणून तसे न करण्यास भाग पाडले.
मात्र दीड महिन्यानंतर, 19 सप्टेंबर रोजी पीडितेच्या पालकांनी औपचारिक तक्रार पोलिसांकडे नोंदवली. या प्रकरणी शिक्षक कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस 2023) कलम 74 तसेच पॉस्को कायदा 2012 कलम 8, 12 आणि 21 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तक्रार रोखण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी प्रकाश रामजी शिगवण, सुभाष रामजी शिगवण, वैभव पांडुरंग भानसे, पांडुरंग यशवंत शिगवण, रघुनाथ गुणाजी भानसे, शंकर रामजी होडबे, मनोहर जानू जोशी, संदीप यशवंत कांबळे आणि राकेश साळुंखे या नऊ जणांविरोधातही गुन्हे दाखल झाले आहेत. बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय चव्हाण यांनी गुन्हा नोंद झाल्याची माहिती दिली.