रत्नागिरी:- एकीकडे बालविवाह रोखण्यासाठी सरकार विविध कायदे व जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे आजही ग्रामीण भगाात आजही बालविवाह होताना दिसतात. असाच प्रकार वर्षभरानंतर रोह्यात उघडकीस आला असून, रोहा पोलिसांनी रत्नागिरीतील मिरजोळे पडवेवाडी येथील प्रवीण पवार याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रोहा तालुक्यातील तांबडी बौद्धवाडीत एका १६ वर्षांच्या मुलीचा विवाह गतवर्षी जबरदस्तीने लावण्यात आला होता. या घटनेनंतर रोहा पोलिस ठाण्यात पीडित मुलीचे आई‚वडील, सासू व सासरे यांच्याविरोधात बालविवाह लावून देणे, तर पतीविरोधात बालविवाहसहित बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांबडी बौद्धवाडीतील १६ वर्षीय मुलीचा रत्नागिरी येथील पाडवेवाडी (मिरजोळे) येथील प्रवीण संजय पवार (२२) याच्याबरोबर गतवर्षी दि. १० मे २०२४ ला विवाह झाला होता. पीडित मुलगी अल्पवयीन आहे, हे माहीत असूनदेखील मुली व मुलाकडील मंडळींनी लग्न लावले. मुलगी आता पाच महिन्यांची गर्भवती असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर दि. २ मे रोजी रोहा पोलिस ठाण्यात पीडित मुलीचा पती प्रवीण संजय पवार, सासू संगीता संजय पवार, सासरे संजय आप्पा पवार (तिघेही राहणार तरडगाव, फलटण‚सातारा) मुलीचे वडील बबन बाबुराव जाधव, आई सविता बबन जाधव (रा. तांबडी बौधवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.