अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला ६ वर्षांची शिक्षा

खेड:- शहरातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका सरकारी कर्मचाऱ्याला ६ वर्षांची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे . खेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर एम. देशपांडे यांनी हा निकाल दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसीफ अल्लाउद्दीन तडवी ( रा . शिवतर रोड , संत सेनानगर , ता . खेड , जि . रत्नागिरी मूळ रा . सावखेडा सीम पोस्ट दहीगाव , ता . यावल , जि . जळगाव ) असे त्याचे नाव आहे . ही घटना १९ मे २०२३ रोजी घडली होती . सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले . परिस्थितीजन्य पुरावा न्यायालयासमोर मांडण्यात आला . न्यायालयाने पुरावे ग्राह्य धरून आरोपीला पोक्सोचे कलम १० नुसार ६ वर्षे सश्रम कारावास आणि २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे . तसेच भारतीय दंड विधान कायदा कलम ३५४ ( १ ) १ वर्ष सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास , कलम ३५४ ( अ ) ( १ ) ( आय ) नुसार १ वर्ष सश्रम कारावास , कलम ४५१ – १ वर्ष सश्रम कारावास आणि १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास , कलम ५०६ नुसार १ वर्ष सश्रम कारावास , अशी शिक्षा ठोठावली आहे . अतिरिक्त सरकारी अभियोक्ता एन . बी . धोंगडे आणि जिल्हा सहायक सरकारी अभियोक्ता मृणाल जाडकर यांनी कामकाज पाहिले . तपासिक अंमलदार म्हणून पोलिस निरीक्षक नितीन भोयर तसेच कोर्ट पैरवी म्हणून सूरज माने यांनी काम पाहिले.