रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथील जामा मशीदमध्ये कुराण पठण शिकण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृध्द मौलवीला विशेष पोक्सो न्यायालयाने गुरुवारी १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास घडली होती. अलिमियाँ मोहम्मद सोलकर ( ७४, रा. मारुतीमंदिर, रत्नागिरी ) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपी मौलवीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पीडितेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती . त्यानुसार , अल्पवयीन पीडिता ही २८ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री मिरकरवाडा येथील जामा मशीद मध्ये कुराण पठण शिकण्यासाठी गेली होती. तेव्हा तेथील मौलवी अलिमियाँ सोलकरने तिला तेथील बाथरूमध्ये नेऊन तिचा विनयभंग केला होता . ही बाब पीडितेने तिच्या पालकांना सांगताच त्यांनी मौलवी विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अलिमियाँ विरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुक्ता भोसले यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विनयभंगाची ही बाब तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसून आली होती . या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड . मेघना नलावडे यांनी ७ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून विशेष पोक्सो न्यायाधीश वैजयंतीमाला . ए . राऊत यांनी आरोपी अलिमियाँ सोलकरला १ वर्ष कारावास आणि ४ हजार रुपये दंड; तो न भरल्यास १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल अर्चना कांबळे यांनी काम पाहिले.