अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करणाऱ्या शिक्षक आरोपीला उच्च न्यायालयातून जामीन मंजूर 

रत्नागिरी:-अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करणाऱ्या शिक्षक आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तक्रार दाखल करायला झालेला विलंब आणि सबळ वैद्यकीय पुरावा नसल्याने न्यायालयाने आरोपी शैलेश जाधव याची 25 हजाराचा जामिन मंजूर केला आहे. 

रत्नागिरी येथील शिक्षक याने 29 ऑगस्ट 2015 रोजी एका 16 वर्षीय मुलाबरोबर ओळख वाढवली होती. त्यानंतर त्याने त्या मुलाला चायनीज खाण्याचे आमिष दाखवले. भगवती बंदर येथे डोंगरावर नेऊन मुलासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रसंगाची वाच्यता बाहेर केल्यास जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी शैलेश जाधव याच्या वरती गुन्हा दाखल झाला असून रत्नागिरीतील विशेष सत्र न्यायाधीशांकडे हा खटला चालला.

या खटल्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी तसेच पिडीत याचा जबाब यांचा विचार केल्यावर रत्नागिरी विशेष सत्र न्यायालयाने आरोपी शैलेश जाधव याला सात वर्षाचा कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

आरोपी शैलेश जाधव याने मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. फेब्रुवारी 2020 पासून हा आरोपी रत्नागिरी कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहे. आरोपीच्या अपिला वरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता तक्रार दाखल करायला झालेला 50 दिवसांचा विलंब आणि सबळ वैद्यकीय पुरावा नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी शैलेश जाधव याचा 25 हजारांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. आरोपी शैलेश जाधव यांच्यावतीने एडवोकेट राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम पाहिले.