अलोरेतील देवरे मार्केटमधील दुकानात आग; सहा लाखांचे नुकसान 

चिपळूण:- तालुक्यातील अलोरे येथील देवरे मार्केट किराणा दुकानाला आग लागली. ही घटना बुधवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग अटोक्यात आली. या आगीत दुकानातील सुमारे ६ लाखाचे साहित्य भस्मसात झाले आहे.

सकाळी पहाटेच्या सुमारास नेमक्या कोणत्या कारणामुळे ही आग लागली, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. हनुमंत चव्हाण यांच्या मालकीचे हे दुकान आहे. किराणा दुकानाला आग लागल्याची घटना चव्हाण यांना समजल्यानंतर त्यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचा प्रयत्न झाला.तरी आगीने रौद्ररूप धारण केले होते. या घटनेची माहिती तत्काळ आग्निशामन विभाग पोफळी, महानिर्मिती यांना देण्यात आली. त्यानुसार येथील कनिष्ठ अग्निशामन अधिकारी जे. के. यादव, वाहनचालक एस. आर. चव्हाण, व्ही. ए. पाटील, आर. पी. पाटील, व्ही. जे. चव्हाण, आर. जी. मातकर आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आली. आगीत दुकानातील सर्वच साहित्य जळून खाक झाले आहे. यातून चव्हाण यांचे सुमारे सहा लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.