रत्नागिरी:- अरबी समुद्राच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत हे क्षेत्र पश्चिम वायव्य भागाकडे सरकेल. यामुळे राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
मालदीव परिसर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय व नैर्ऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. राज्यातील अनेक भागांत सकाळपासून उकाडा वाढला असून, कमाल व किमान तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. यामुळे राज्यातील थंडी गायब झाली आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसपर्यत वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यत परभणी कृषी विद्यापीठ येथे १६.२ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत असले, तरी त्याचा प्रभाव फारसा नसल्याने थंडी कमी झाली आहे. विदर्भातील जवळपास सर्वच भागांत काहीशी थंडी कमी झाली असल्याने किमान तापमानाचा पारा सरासरीहून अधिक वाढला आहे. विदर्भात १७ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मराठवाड्यातही थंडी नसल्याने किमान तापमानात १६ ते २१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रात काही प्रमाणात गारवा असला, तरी ढगाळ हवामानामुळे दिवसभर उन्हाचा चटका व रात्री काहीसा गारवा आहे. कोकणातील किमान तापमानात झपाट्याने बदल होत असले, तरी किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.









