अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी महिलेसह तिघांना तडीपारीचे आदेश

रत्नागिरी:- अंमली पदार्थांची विक्री प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या तिघांना रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी शुक्रवारी हद्दपारीचे आदेश दिले. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

रत्नागिरीचे प्रांताधिकारी यांच्याकडे जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री संदर्भात एकूण 9 प्रकरणे दाखल केली होती. यामध्ये तीनजणांना यापूर्वीच हद्दपार करण्यात आले होते. शुक्रवार 11 एप्रिल रोजी रत्नागिरी झाडगाव येथील हेमंत भास्कर पाटील, राजिवडा येथील रिहाना उर्फ रेहाना उर्फ रिजवाना गफार पकाली या महिलेला तर जयस्तंभ येथील अमेय राजेंद्र मसुरकर यांनाही हद्दपारीचे आदेश दिले आहे.

याप्रकरणात आणखी दोघां विरोधात सुनावणी सुरु असून, त्याबाबतही लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. एक संशयित अमिर मुजावर याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्ताव असून सध्या हा तरुण जिल्हा कारागृहात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या तिघांनाही रत्नागिरी जिल्ह्यासह लागून असलेल्या पाच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.