राजापूर:- लाईट बंद केल्याच्या रागातून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी पाचल येथील तुषार बबन जाधव याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याप्रकरणी राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप विलास बंडगर ( वय ४० ) हे महावितरण शाखा कार्यालय पाचल येथे कनिष्ठ अभियंता या पदावर कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी ते पाचल येथील महावितरण उपकेंद्र कार्यालयात असताना दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास पाचल येथील तुषार जाधव हा कार्यालयात आला व त्यांनी लाईट का बंद करण्यात आली? अशी विचारणा केली . यावेळी बंडगर यांनी काम चालू आहे, थोड्या वेळात लाईट येईल, असे सांगितले. याचा पाचलकर याला राग आल्याने त्यांनी शासकीय कामात व्यत्यय आणून बंडगर यांना शिवीगाळ व दमदाटी केली . याबाबत बंडगर यांनी राजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून तुषार पाचलकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस नाईक वीर करत आहेत.