रत्नागिरी:- अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची पदोन्नतीने प्रशासकीय बदली झाली आहे. रत्नागिरी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. पावणेदोन वर्षे त्यांनी अपर जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. लोकसभा, विधानसभा निवडणुका यशस्वी पार पाडण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
प्रशासकीय निकड म्हणून सार्वजनिक सेवेच्या, लोकहितास्तव सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये शंकर रामचंद्र बर्गे यांची पदोन्नतीने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. रत्नागिरीत रिक्त झालेल्या अधिकाऱ्याच्या पदावर अन्य अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहेत. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून शंकर बर्गे यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये कार्यभार घेतला.
प्रशासनावर त्यांची चांगली पकड आणि स्वभावामुळे त्यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्धल आदराची भावना आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकी यशस्वी पार पाडल्या. जिंदल कंपनीत झालेल्या वायू गळतीनंतर सुमारे ९० मुलांना बाधा झाली होती. यावेळी त्या मुलांवर योग्य आणि जलदगतीने उपचार होण्यासाठी ते दोन दिवस जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते.









