अन्वी कन्स्ट्रक्शनला भाववाढीपोटी 8 कोटी 95 लाख 

शासनाकडून आलेला निधी देण्याबाबत एकमुखी निर्णय 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नळपाणी योजनेचे काम करणाऱ्या अन्वी कन्स्ट्रक्शन कंपनीला स्थगिती कालावधीत झालेल्या भाववाढीपोटी 8 कोटी 95 लाख 28 हजार 946 रुपये इतका निधी देण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या रनपच्या विशेष सभेत घेण्यात आला. एमजीपीने भावाढीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. राज्य शासनाने हा निधी मंजूर करून रनपकडे वर्ग केल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सभागृहात दिली. भावाढीचा कोणताही बोजा रनपच्या तिजोरीवर पडणार नसल्याने अन्वी कन्स्ट्रक्शनला निधी देण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी निर्णय घेतला. 
 

रत्नागिरी नगर परिषदेची विशेष सभा सोमवारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत रनपच्या सुवर्णजयंती नगरोथान अभियान अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेकरिता ‘गॅप फंडिंग’ म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून स्थगिती कालावधीत पाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदाराने मागणी केलेल्या भाववाढ व नुकसान भरपाईची रक्कम देण्याचा विषय सभागृहात ठेवण्यात आला. 
 

याबाबत भाजप गटनेते समीर तिवरेकर यांनी विचारणा केली. सभागृहात माहिती देताना नगराध्यक्ष साळवी यांनी पाणी योजनेबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे 308 दाखल करण्यात आला होता. कोकण आयुक्तांनी या योजनेला स्थगिती दिली. स्थगितीच्या कालावधीत कामबंद असल्याने योजनेतील पाईप्स, फिटिंग, स्टील व इतर साहित्य खरेदी करता आले नाही. या कालावधीत या साहित्याची झालेली भाववाढ आणि शटरिंग साहित्य, देखभाल खर्च व यंत्र भाडे याची नुकसान भरपाइ मिळावी अशी मागणी अन्वी कन्स्ट्रक्शने केली. 
 

भाववाढी संदर्भात अन्वी कन्स्ट्रक्शनने हायकोर्टात धाव घेतली. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी 8 कोटी 95 लाख 28 हजार 946 रुपयांचा प्रस्ताव हायकोर्टात सादर केला. हायकोर्टाने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम रत्नागिरी नगर परिषदेला देणे शक्य नसल्याने ही रक्कम राज्य शासनानेच द्यावी असा ठराव रनप करून राज्य शासनाकडे सादर केला होता. यानुसार राज्य शासनाने निधी उपलब्ध केल्याची माहिती नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिली. हा निधी अन्वी कन्स्ट्रक्शनला देण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला.