अनिल परब यांना २८ मार्चपर्यंत न्यायालयाचा दिलासा

रत्नागिरी:- दापोलीतील साई रिसॉर्ट मनी लाँडरींग प्रकरणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना न्यायालयाने आठवड्यात दुसऱ्यांदा दिलासा दिला आहे. दरम्यान, २० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत २३ मार्चपर्यंत परब यांच्यावर कारवाई करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहे. तो दिलेला दिलासा आज कायम ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आज परब यांच्यावर २८ मार्चपर्यंत कठोर कारवाई करू नये, असे निर्देश अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिले आहेत.

कामकाजाला कोर्ट उपलब्ध नसल्याने दोपोलीतील साई रिसॉर्ट, मनी लाँडरींग प्रकरणी सुरू असलेली सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अनिल परब यांना २० मार्च रोजी दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, साई रिसॉर्टप्रकरणी आतापर्यंत ‘ईडी’ने तीन जणांना अटक केलेली आहे. यात सदानंद कदम, जयराम देशपांडे, सुधीर पारदुले यांचा समावेश आहे. यातील सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागिदार आहेत. त्यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘​​​​​​ईडी’च्या कारवाईत दिलासा मिळावा यासाठी अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ‘ईडी’ने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेली ‘ईसीआयआर’ रद्द करण्याची मागणी करणारी याचिका अनिल परब यांनी दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने अनिल परब यांना २० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते.

दरम्यान, २० मार्च रोजी झालेल्या सुनावणीत २३ मार्चपर्यंत ‘ईडी’ने त्यांच्यावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आज (ता. २३) झालेल्या सुनावणीत पुन्हा परब यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी कामकाजाला कोर्ट उपलब्ध नसल्याने परब यांच्यावर ‘ईडी’ने २८ मार्चपर्यंत कोणतीही मोठी कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहे. त्यामुळे परब यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे.