अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक नुकसानीपोटी जिल्ह्याला 9 कोटी 60 लाखांची गरज

रत्नागिरी:- कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 10 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत 64 हजार शेतकर्‍यांचे 11 हजार 812 हेक्टर भात, नाचणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर झालेल्या मदतीच्या निकषानुसार 9 कोटी 60 लाख रुपयांची गरज भासणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अरबी समुद्रात विलीन झाले. बदलत्या वातावरणामुळे 10 ऑक्टोबरपासून कोकण किनारपट्टीवर पावसाला सुरवात झाली. याचा सर्वाधिक फटका भातशेतीला बसला. या कालावधीत हळवी भातं कापणी योग्य झाली होती. अनेकांनी पावसाचा अंदाज न घेताच कापणी करुन ठेवली होती. अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात अनेकांची भातं वाहून गेली. काहींच्या उडव्याही वाहून गेल्या. सर्वाधिक फटका संगमेश्‍वर, रत्नागिरी तालुक्याला बसला आहे. तेथील नदीकिनारी भातशेती पाण्यामुळे आडवी झाली. 48 तासापेक्षा अधिक काळ शेती आडवी होऊन पाण्याखाली राहील्यामुळे ती कुजून गेली. काही ठिकाणी पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आले होते. हातातोंडाशी आलेले पिक वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला होता. या परिस्थितीची दखल घेऊन शासनाकडून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करा असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दोनवेळा बैठक घेऊन कृषी विभागाला दिले होते. कृषी अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केले. कातळावरील कापलेली भातशेतीही वाया गेल्याने उत्पादनावर परिणा होणार आहे. आठ ते दहा दिवस पावसाचा जोर राहिल्यामुळे भाताचा दर्जा घसरण्याची भिती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाचे पंचनामे पूर्ण झाले असून तसा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. सरकारकडून हेक्टरी 10 हजार रुपये जाहीर केले आहेत; मात्र तसा शासन निर्णय अद्यापही आलेला नसल्यामुळे शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.