अणुस्कुरा चेक पोस्टवर गोवा बनावटीची दारु जप्त

वाहनासह सुमारे तीन लाख ६३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

पाचल:- मागील काही दिवस तालुक्यात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई होत असून अणुस्कुरा चेक पोस्ट येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्यावतीने धडक कारवाई करताना वाहनसह गोवा बनवटीच्या दारूचे सुमारे ९५ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. सुमारे ६३ हजार ६५० रुपये किंमतीची दारू साठा असल्याची माहिती रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी दिली.

राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अणुस्कुरा चेकपोस्ट येते. या ठिकाणी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना अचानक टाटा कंपनीची टाटा इंट्रा (एम एच ०७,ए. जे.३७३९) ही गाडी आली असता तेथे उपस्थित असलेले ए.एस.आय.कमलाकर पाटील पोलिस शिपाई बळीप,आणि पो. कॉ. रामदास पाटील असे नाकाबंदी करत असताना त्यांनी ती गाडी थांबविली आणि त्या गाडीची तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या दारूची किंमत ६३६५०/- रुपये व सुमारे तीन लाख किंमतीचे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण ३ लाख ६३ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.असून महा. दारूबंदी कायदा ६५(अ)(इ)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.