रत्नागिरी:- अंमली पदार्थ विक्रीविरोधात जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यात आली होती. 20 गुन्ह्यांमध्ये 36 संशयितांना अटक करण्यात आली. न्यायालयाने जामिन दिल्यानंतर त्यांनी पुन्हा तोच व्यवसाय करू नये यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून सहा जणांवर तडीपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असून अजून 25 जण तडीपारीसाठी प्रस्तावित असल्याची माहिती पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
जिल्ह्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस कारवाईबरोबरच जनजागृती केली जात आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करत विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे. ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री होते त्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. अंमली पदार्थांबाबत नागरिकांना माहिती मिळाल्यास तात्काळ नजिकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री.धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.









