चिपळूण गोवळकोट रोड येथे कारवाई
चिपळूण:- चिपळूणमधील गोवळकोट रोड, पालोजी बाग परिसरात बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे (गांजा) सेवन करणाऱ्या एका तरुणाला चिपळूण पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथील गोवळकोट रोडवरील पालोजी बाग परिसरात एक तरुण संशयास्पदरीत्या बसला होता. पोलीस कॉन्स्टेबल शैलेश शांताराम वनगे आणि त्यांच्या पथकाला हा तरुण गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलिसांनी सतगरु नारसिंग (वय २७ वर्षे, रा. पालोजी बाग, गोवळकोट रोड, चिपळूण) याला अटक केली आहे. आरोपी सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करून कायद्याचे उल्लंघन करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ७९/२०२६ नुसार नोंद करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ चे कलम ८(क) आणि २७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चिपळूण पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून, शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत.









