Saturday, May 23, 2026
spot_img
Home लांजा अंगणात पाय घसरून पडल्याने  वृद्धाचा मृत्यू

अंगणात पाय घसरून पडल्याने  वृद्धाचा मृत्यू

लांजा:- पावसामुळे अंगणात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले असताना पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या लांजा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तुकाराम सोनू जांगळे (रा. रिंगणे कोंडगाव, ता. लांजा) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. तुकाराम जांगळे यांच्या पत्नी सुनंदा जांगळे काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी गावात पाऊस पडल्याने अंगणात साचलेले पाणी काढण्यासाठी तुकाराम जांगळे घराबाहेर आले. पाणी काढत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्याने ते घराच्या पायरीवर जोरात आदळले. या अपघातात त्यांच्या छातीला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली.

​घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांचे भाऊ लक्ष्मण सोनू जांगळे यांनी त्यांना तातडीने खाजगी वाहनातून ओणी (राजापूर) येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने २८ मार्च रोजी पहाटे ३ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

​याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद ( २१/२०२६) करण्यात आली आहे. ३ एप्रिल रोजी या प्रकरणाची अधिकृत नोंद पोलीस दप्तरी झाली असून अधिक तपास सुरू आहे.