१० तोळे दागिन्यांसह ५ लाख ७६ हजारांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- तालुक्यातील हातखंबा सुतारवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. मृणाल महेश पांचाळ (वय ४८, रा. हातखंबा सुतारवाडी) यांनी याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
काही महिन्यांपासून रत्नागिरी जिल्ह्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. हातखंबा परिसरातच चोरट्यांनी घरफोडी केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. १ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मृणाल पांचाळ यांच्या मालकीचे घर फोडले. चोरट्यांनी घराची खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी मोर्चा घरातील लोखंडी कपाटाकडे वळविला. चोरट्यांनी कोणत्यातरी हत्याराने कपाट उचकटून आतील १० तोळे सोन्यासह ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. रविवारी सकाळी घरामध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. यावेळी घरमालक मृणाल पांचाळ यांनी तातडीने घटनेची खबर गावच्या पोलिसपाटील व रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानुसार ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक व फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले होते.









