हातखंबा येथे 10 ते 14 मे दरम्यान जनता कर्फ्यू

रत्नागिरी:- हातखंबा परिसरात कोविड रुग्णांची संख्या शंभरपर्यंत पोचली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींने जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला असून 10 ते 14 मे या कालावधीत याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद राहतील. तसेच विनाकारण बाहेर फिरणार्‍यांवरही दंडात्मक कारवाई करतानाच कोरोना चाचणी केली जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या हातखंबा गावामध्ये गेल्या काही दिवसात शंभरहून अधिक रुग्ण सापडले आहेत. या परिसरात काही व्यावसायिक सकाळच्या सत्रात दुकाने उघडी ठेवतात. महामार्गावर बाहेरुन माल वाहतूकीची वाहने ये-जा करताना याठिकाणी थांबतात. ती कोरोना स्प्रेडर बनल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे हातखंबा परिसरातील सर्वच दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 10 ते 14 मे या कालावधीत याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. गावात कामाशिवाय फिरताना कोणीही आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल. त्याची कोरोना चाचणी बंधनकारक केली जाणार आहेत. 15 मे रोजी गावातील कोरोना रुग्णांची संख्या पाहून ग्रामकृती दल दुकाने सुरु करण्यासंदर्भातला निर्णय घेईल. बंद कालावधीत कोणतीही दुकाने उघडी आढळल्यास त्यांना 5000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. सर्व दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. या कालावधीत हॉटेल, किराणा दुकान, जनरज स्टोअर, दूध, भाजी, मासे, मटण, चिकन व हार्डवेअर विक्रेते यांचीही दुकाने बंद राहतील. डॉक्टर व मेडिकल अत्यावश्यक सुविधा म्हणून कायम सुरु राहतील. गावातील बँक सेवा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे बंद राहतील. ताप, सर्दी, खोकला, लूजमोशन आढळल्यास ग्रामकृती दलास तातडीने कळवा.