वाढलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी कारवाई
रत्नागिरी:- मुंबई-गोवा व मि-या नागपुर या दोन राष्ट्रीय महामार्गांवर गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबा यांनी राबविलेल्या ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह मोहिमेमध्ये नशापान करुन वाहन चालकांची तपासणी करुन कारवाई करण्यात आली आहे. शिवाय रस्ते वाहतुकीचे नियम तोडणा-या चालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात अपघातांचे प्रमाण काही अंशी कमी करण्यात यश आले आहे.
याबाबतीत महामार्ग वाहतुक पोलीस मदत केंद्र हातखंबाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या काही दिवसात या विभागातील दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये वाढ झाली होती. त्यातसोबत महामार्गावर अवजड वाहतुक करणारे वाहन चालक नशापाणी करुन वाहन चालवून अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे लक्षात आल्याने महामार्गावर हातखंबा येथे वाहन चालकांची अचानकपणे ब्रीथ ॲनालायझर तपासणी मोहिम राबवण्यात आली त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहन चालकांची वैद्यकिय चाचणी पाली ग्रामीण रुग्णालय येथे केल्यावर ७ चालकांचे अहवाल सकारात्मक आले.
या ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह मोहिमेमध्ये दोषी आढळलेल्या चालकांना प्रत्येकी २ हजाराचा दंड करण्यात आला. तसेच या चालकांसोबतच अन्य वाहतुकीचे नियम तोडून धोकादायकपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरु शकणा-या १७७ वाहन चालकांचे वाहन परवाना निलंबनासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. यासोबतच महामार्गावरील प्रवास करणा-या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
महामार्गावर वाढलेल्या अपघातांना आळा घालण्यासाठी हातखंबा टॅपतर्फे महामार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राच्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यासाठी गस्त घालण्यात येत आहे. तसेच वाहन चालकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करुन वाहन चालविल्यास अपघात कमी होतील त्यासाठी चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे आवाहन हातखंबा टॅपतर्फे करण्यात आले आहे.









