दापोली:- दोन हस्तीदंत जवळ बाळगल्याप्रकरणी मंडणगड येथील तरुणासह रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील – एकाला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एक स्कूटर, २ मोबाईलसह १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आकाश प्रकाश पवार (२८, रायगड, माणगाव), नितीन विलास धामणे (२६, मंडणगड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
रविवारी सायंकाळी डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात दोन तरुण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची खबर मानपाडा पोलिसांना मिळाली. यानुसार मानपाडा पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत मानपाडा पोलिसांनी ३९ सेंटीमीटर व ८ सेंटीमीटरचे दोन हस्तीदंत ताब्यात घेतले आहेत. त्यातील एकाची गोलई २२ सेमी, तर दुसऱ्याची २१ सेमी आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९,३९,४४,४९ (क) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ ३ कल्याणचे पोलीस उप आयुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) दत्तात्रय गुंड, पोलीस निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) जयपाल गिरासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळेभात, संपत फडोळ, पोलीस हवालदार राजेंद्रकुमार खिलारे, सचिन साळवी, सुनील पवार, शिरीष पाटील, संजू मासाळ, विकास माळी, पोलीस नाईक, गणेश भोईर, कृष्णा बोराडे, यल्लापा पाटील, पोलीस शिपाई घनःश्याम ठाकुर, अशोक आहेर, गणेश बडे, सोपान शेळके यांच्या पथकाने केली. दरम्यान, हे हस्तीदंत खरे आहेत की खोटे, याचा तपास पोलीस करत आहेत. या बाबत मानपाडा पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला.