रत्नागिरी:- पादचाऱ्याला ठोकर देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरून घटनास्थळावरून पसार झालेल्या संशयिताला तब्बल १० वर्षांनी बेड्या ठोकण्यात सावर्डे पोलिसांना यश आले आहे. हा अपघात ९ डिसेंबर २०१० साली सावर्डे येथे झाला होता.
९ डिसेंबर २०१० रोजी यातील फरारी आरोपी नजमुद्दिन सोहराब खान (रा . शिवडी , मुंबई) हा तवेरा गाडीने येथील मुंबई गोवा हायवेने जात असताना रस्त्याने चालत जाणाऱ्या भिकाजी जयराम बागवे ( वय ७५ वर्षे) या वृद्धास ठोकर मारुन निघून गेलेला होता. या अपघातामध्ये पादचारी भिकाजी जयराम बागवे यांचा मृत्यु झाला होता.
या अपघात प्रकरणी सावर्डे पोलिसांनी चालक नजमुद्दिन सोहराब खान याचे विरोधात भादविक ३०४ ( अ ) २७९, ३३७,३३८,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र घटनेनंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता.
यातील संशयित आरोपी चाळीसगांव येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी फरारी आरोपींना पकडण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकाचे पोना चंदन जाधव , प्रविण खांबे , सत्यजित दरेकर , पोकॉ / रियाज मुजावर , ओकार पवार , हे चाळीसगाव येथे गेले आणि त्यांनी यातील संशयित फरार आरोपी नजमुद्दिन सोहराब खान याच्या मुसक्या आवळून त्याला सावर्डे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.









