सावकारी कायद्यानुसार आई-मुलाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- सुमारे अडीच महिन्यांपूर्वी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या पथकाने टिआरपी येथील शिर्के मेन्शन येथे अवैध सावकारी व्यवसाय प्रकरणी धाड टाकली होती. त्याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा शहर पोलिस ठाण्यात माय-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

रोहन गजेंद्र शिर्के आणि त्याची आई लिना गजेंद्र शिर्के (दोन्ही रा.शिर्के मेन्शन टिआरपी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे.याबाबत नरेश विठोबा जाधव (रा.सोमेश्‍वर, रत्नागिरी) यांनी जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अर्ज केला होता. त्या अर्जाची दखल घेत जिल्हा उप निबंधक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांच्या पथकाने शिर्के यांच्या घरी जाउन सावकारी कर्जाचे सर्व दस्तऐवज पथकास उपलब्ध करुन देण्याची नोटीस दिली होती.परंतू शिर्के यांनी कोणतीही कागदपत्रे त्यांच्या समोर हजर केली नव्हती.म्हणून 12 जणांच्या पथकाने त्यांच्या घराची झडती घेतली.त्यात,बॉण्ड पेपर,चेक,हमिपत्र, करारपत्र अशी आक्षेपार्ह कागदपत्रे मिळून आली होती.तसेच लिना शिर्के हिच्याकडे सावकारी व्यवसाय करण्याचा परवाना रत्नागिरी तालुक्यापुताच मर्यादित असतानाही  राजापूर येथील रामनाथ वाकडे यांच्यासोबत केलेले करारपत्र मिळून आल्याने ती रत्नागिरी तालुक्याबाहेरही सावकारी व्यवसाय चालवत असल्याचे निदर्शनास आले होते.
याबाबत जिल्हा उप निबंधक सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्रीहरी देवू पळसकर (58) यांनी शुक्रवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात रोहन शिर्के आणि लिना शिर्के यांच्याविरोधात तक्रार दिली.त्यानूसार या दोघांविरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 4,23,39,41,42 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.