फुणगुस गुरववाडी येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर:- तालुक्यातील फुणगुस-गुरववाडी येथे सामाईक घराच्या वादातून दोन नातेवाइकांनी मिळून पती-पत्नीवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका महिलेसह दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी सौ. साक्षी सचिन गुरव (वय ३६, रा. फुणगुस गुरववाडी, ता. संगमेश्वर) आणि आरोपी एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून ते एकाच सामाईक घरात वेगवेगळ्या भागांत राहतात.
घटनेच्या दिवशी फिर्यादी साक्षी गुरव आणि त्यांचे पती सचिन जयराम गुरव हे घरी असताना, त्यांच्या शेजारी काम करणाऱ्या कामगारांसोबत घराच्या बांधकामाबाबत चर्चा करत होते. ही चर्चा सुरू असतानाच, तिथे आलेल्या आरोपी क्र. १ अक्षय अशोक गुरव याने जुन्या रागातून फिर्यादी साक्षी यांच्या पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला. या अनपेक्षित हल्ल्यात साक्षी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
पत्नीला वाचवण्यासाठी पती सचिन गुरव हे तात्काळ पुढे सरसावले असता, आरोपी अक्षय याने त्यांनाही सोडले नाही. त्याने हातातल्या लाकडी दांडक्याने सचिन यांच्या डाव्या खांद्यावर आणि उजव्या पायावर जबर प्रहार करून त्यांनाही जखमी केले. याच वेळी तिथे उपस्थित असलेल्या आरोपी क्र. २ निशा अशोक गुरव हिने फिर्यादी आणि त्यांच्या पतीला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत थेट जानून मारून टाकण्याची धमकी दिली.
या गंभीर मारहाणीत सौ. साक्षी गुरव आणि सचिन गुरव हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. याप्रकरणी सौ. साक्षी गुरव यांनी १५ मे रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अक्षय अशोक गुरव आणि निशा अशोक गुरव यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कौटुंबिक वादातून झालेल्या हाणामारीचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.









