रत्नागिरी:- गेली सात वर्ष मैदानाचे काम सुरु असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या खेळपट्टीचे काम पूर्ण झाले असून, बुधवारपासून या खेळपट्टीवर सात वर्षानंतर 19 वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.
रत्नागिरीतील प्रसिध्द छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या खेळपट्टी व अन्य विकास कामांसाठी गेली सात वर्ष खेळाडूंसाठी हे मैदान बंद होते. या मैदानावरील खेळपट्टी व अन्य विकास कामांसाठी आतापर्यत सुमारे तीन ते साडेतीन कोटी रुपये खर्च आला आहे. खेळपट्टीच्या बाहेरुन वॉकींग ट्रॅकही उभारला जाणार आहे.
गेले सात वर्ष हे मैदाना क्रिकेट खेळासाठी बंद होते. 21 ऑक्टोबरपासून शालेय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने याठिकाणी पुन्हा क्रिकेटचे सामने सुरु होणार आहे. राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी या क्रिकेट स्पर्धा रत्नागिरीत व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले होते. 19 वर्षाखालील मुलांची राज्यस्तरीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा होत आहे., 21 ते 24 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा होणार असून 23 व 24 ऑक्टोबर रोजी निवड चाचणी होणार आहे. तर 19 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धा या 24 ते 27 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. जिल्हा क्रीडाअधिकारी विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार आहेत.
पुन्हा मैदान सुरु होणार असल्याने रत्नागिरीतील युवा खेळाडूंमध्येही नवचैतन्य पसरले आहे.









