Tuesday, October 13, 2026
spot_img
Home रत्नागिरी साखरतर येथून कामावर गेलेल्या तरुणाचे अपहरण

साखरतर येथून कामावर गेलेल्या तरुणाचे अपहरण

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरालगतच्या साखरतर रेहबर मोहल्ला येथून रत्नागिरी शहरात कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचे अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे साखरतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साखरतर, रेहबर मोहल्ला येथील रहिवासी अस्लम इस्माईल कर्लेकर (वय ५३) यांचा मुलगा वदुद अस्लम कर्लेकर (वय २७) हा शुक्रवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून नेहमीप्रमाणे रत्नागिरी शहरात कामासाठी जाण्यास निघाला होता. तो त्याच्या ताब्यातील मोरपिसी रंगाची ज्युपिटर ग्रँडे एक्स दुचाकी (क्रमांक एम.एच. ०८ ए.डब्ल्यू. १२६०) घेऊन घराबाहेर पडला, मात्र तो कामाच्या ठिकाणी पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्याचे अपहरण केल्याची खात्री पटल्यानंतर वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणी अस्लम इस्माईल कर्लेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, अपहृत तरुणाचा आणि संशयितांचा शोध घेण्यासाठी शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.