रत्नागिरी:- तालुक्यातील सांडेलावगण येथे रस्त्यात गाडी काढण्यावरून मारहाण व त्यानंतर घरात घुसून घरातील वस्तूंचे नुकसान करणाऱ्या तिघांना न्यायालयाने एक वर्षाच्या मुदतीच्या १० हजार रुपयांच्या चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड व ६ हजार नुकसानभरपाई, अशी दंडाची शिक्षा सुनावली.
अमित सदानंद पवार, , रूपेश सदानंद पवार, संतोष यशवंत पवार (सर्व रा. वाकणवाडी, सांडेलावगण) अशी संबधितांची नावे आहेत. हा प्रकार २२ जानेवारी २०१९ ला दुपारी वाकणवाडी रस्त्यावर घडला होता.
पंकज जवाहरलाल कश्यप (वय २५, रा. गणेशवाडी, जयगड) हे कामगारांना जेवण नेण्याकरिता गाडी घेऊन गेले. त्यांनी गाडी सांडेलावगण वाकणवाडी रस्त्यावर लावली. त्या वेळी ती काढण्याबाबत संशयितांनी सांगितले. त्या वेळी त्यांनी गाडी काढण्यास ड्रायव्हर सीटवर बसले संशयितांना त्यांच्या डोक्यात हाताच्या बुक्क्यांनी मारून त्याला गाडीचा दरवाजा उघडून बाहेर काढले. संशयित संतोष पवार याने हातातील कुबड्याने पंकजला मारले. पंकजने मालक सिंकदर याला फोन केला. मालक तिथे येऊन झाल्या प्रकाराची माहिती घेत असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. सिकंदर याचा मित्र मंगेश विभुते हे मोटार सायकलने तिथे आले होते. त्यांनाही गाडीवरून ढकलून दिले आणि त्यांच्या डोक्यात चिरा घालत असताना त्यांनी चिरा चुकवला आणि ते खाली पडले. गावात गेल्यानंतर चुलत्यांच्या घरावर बांधाचे दगड मारले व सिमेंटचे पत्रे फोडून घरात प्रवेश करून घरातील फ्रिजचे व गोबर गॅस शेगडीचे व इतर साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी पंकज कश्यप यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी तिघा संशयितांवर गुन्हा दाखल केला होता. तपास जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस फौजदार डी. टी. साळवी यांनी केला. शनिवारी (ता. ४) या खटल्याचा निकाल मुख्य न्यायदंडाधिकारी राहुल चौत्रे यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे अॅड. विद्यानंद जोग यांनी काम पाहिले. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले तर पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार अनंत जाधव यांनी काम पाहिले.









