सरकारी काम, संपामुळे थांब; संपाचा सर्वसामान्य जनतेला मोठा फटका

रत्नागिरी:- शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संपाच्या तिसर्‍या दिवशीही ठाम दिसून आले. हक्काची पेन्शन घेतल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका कर्मचार्‍यांमधून व्यक्त होत होती. मात्र या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून योजना आणि विकासकामांची अनेक कामे ऐन मार्च एन्डला ठप्प झाली आहेत.

तालुका स्तरावर व जिल्हा परिषदेमध्येही कर्मचार्‍यांना नोटीसा काढण्याच्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरु झाले आहेत. दरम्यान, संपामुळे प्रत्येक विभागांच्या ‘एचओडी’ंचे मात्र वरिष्ठांना माहिती देताना आता दमछाक होऊ लागली आहे.
जिल्ह्यामध्ये शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या संपात तीस ते चाळीस हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. संपाला पाठिंबा देऊन जे अत्यावश्यक विभाग सुरु आहेत. तेही कर्मचारी आता संपात उतरु लागले आहेत.

संपाच्या तिसर्‍या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कर्मचार्‍यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी 10 वाजता प्रत्येक विभागाचे कर्मचारी आपापल्या कार्यालयाबाहेर एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकत आहेत. कोण कर्मचारी कार्यालयात कार्यरत आहेत. याची माहिती घेऊन त्यांना संपात सहभागी होण्याची विनंती केली जात आहे. जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी संपावर ठाम आहेत.

रत्नागिरी तहसीलदारांनी शिस्तभंगाच्या कारवाईची नोटीस बजावल्यानंतर आता तालुकापातळीवर तहसीलदारांकडून नोटीसा बजावण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेमध्येही काही विभागात नोटीसा तयार करण्यात येत आहेत. ठेकेदारीपध्दतीवर कामाला असणार्‍या कर्मचार्‍यांना त्यासाठी अधिकारी वर्गाने हाताशी धरले आहे.
संपाबाबत व अन्य माहिती वेळोवेळी द्यावी लागत असल्याने प्रत्येक विभागांच्या एचओडींची मात्र चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. माहिती कशापध्दतीने संपातील कर्मचार्‍यांकडून मिळवायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारकडून संप मिटवण्याबाबत कोणतीच भूमिका अद्याप जाहीर होत नसल्याने कर्मचारीही संपावर ठाम असल्याचे विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले.