संगमेश्वर बाजारपेठेत पोलीस चौकीसमोरच दुकाने फोडून चोरी

संगमेश्वर:- तालुक्यातील भर नाका परिसरात अलीकडेच झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी थेट पोलीस चौकीसमोरच्या दुकानांत झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरट्याने भर नाक्यावरील दोन दुकानांची शटर उचकटून रोकड आणि इतर साहित्य लंपास केले. इतकंच नव्हे, तर चोरी केल्यानंतर चोरटा शेजारच्या एका हॉटेलमध्ये घुसला आणि बिर्याणीवर ताव मारल्याचे समजताच परिसरात या घटनेची खमंग चर्चा रंगली आहे.

संगमेश्वर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध सुरू आहे. मात्र, अद्याप आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही.

दरम्यान, दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा स्पष्टपणे कैद झाल्याचे समोर आले आहे. त्याने चोरीसोबतच एका मोबाईलवर हात साफ करून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्याला तातडीने पकडावे, अशी मागणी व्यापारीवर्गाकडून केली जात आहे.