विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची तुफानी बॅटिंग, आंबा बागायतदार संकटात
संगमेश्वर:- गुरुवारी सकाळपासूनच संगमेश्वर तालुक्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते. हवामानाचा अंदाज आणि सकाळपासून जाणवणारा प्रचंड उकाडा पाहता पाऊस पडणार हे निश्चित मानले जात होते. गेले काही दिवस वातावरणात कमालीचा उष्मा वाढला होता, तर आज सकाळपासून अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते आणि पावसाची प्रतीक्षा करत होते, मात्र हा पाऊस इतक्या रौद्र रूपात येईल याची कोणालाही कल्पना नव्हती.
दुपारनंतर मात्र वातावरणात अचानक बदल झाला आणि आभाळ पूर्णपणे भरून आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार सुरुवात केली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या या अवकाळी पावसाने संगमेश्वर भागाला अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील इतर अनेक भागातही पावसाने प्रचंड धुमशान घातले असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या जोरदार वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आधीच संकटात असलेला आंबा बागायतदार पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यावर्षी वारंवार बसत आहे. काही दिवसांपूर्वीच एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते, त्यातून शेतकरी सावरत असतानाच आता पुन्हा या वादळी पावसामुळे झाडावर शिल्लक राहिलेल्या आंबा पिकाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तयार आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडला असून, पावसाच्या पाण्यामुळे उर्वरित फळांवर डाग पडण्याची आणि बुरशीजन्य रोग वाढण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या लोकांची आणि कामावरून घरी परतणाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रस्त्यावर अचानक पाणी वाहू लागल्याने वाहनचालकांनाही कसरत करावी लागली. पावसामुळे आणि विजांच्या कडकडाटामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाकडून अनेक भागांतील वीज प्रवाह खंडित करण्यात आला होता. दीर्घकाळ वीज प्रवाह खंडित राहिल्याने आणि त्यातच पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांचे हाल झाले.
मे महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या या अस्मानी संकटामुळे तालुक्यातील शेती व्यवसायाचे गणित पूर्णपणे कोलमडले असून बागायतदारांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता तालुक्यातून जोर धरत आहे.









