Friday, October 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू

रत्नागिरी:- पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या शिवार आंबेरे येथील एका ३१ वर्षीय विवाहितेचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे, सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या मधुरा मनोज मेस्त्री (वय ३१) यांचा ४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी पतीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या नैराश्यातून मधुरा यांनी घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध (रेटॉल) प्राशन केले. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ८ ऑक्टोबर रोजी पुढील उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले.

नायर रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ३९/२०२६ अशी नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.