Friday, May 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिवाजीनगर येथे कारच्या धडकेत वृद्ध जखमी

शिवाजीनगर येथे कारच्या धडकेत वृद्ध जखमी

महिला डॉक्टरवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर परिसरात एका भरधाव कारने पादचाऱ्याला जोराची धडक दिली. या अपघातात चांदेराई येथील एक ७० वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कार चालक महिला डॉक्टरविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना मंगळवार, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील प्रविण सुपर मार्केटसमोर घडली. फिर्यादी पोलीस हवालदार शरद बाबल्या कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची चौकशी पूर्ण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉ. भाग्यश्री मनोहर हेडाऊ-श्रोते (वय ३५, रा. लांजा) या आपल्या ताब्यातील अल्टो के-१० कारने (क्र. MH 08 AX 8831) मारुती मंदिरकडून लांजा साळवी स्टॉपच्या दिशेने जात होत्या. प्रविण सुपर मार्केटसमोर आल्यावर त्यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली.

​यावेळी रस्ता ओलांडणारे पादचारी जब्बार इस्माईल बंदरी (वय ७०, रा. इब्राहीम पट्टण, चांदेराई) यांना कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बंदरी यांना गंभीर दुखापत झाली असून कारचेही नुकसान झाले आहे.

​रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी डॉ. भाग्यश्री हेडाऊ यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.