Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी

शिरगाव-गायवाडी येथे गाडी काढण्यास सांगितल्याने ज्येष्ठ नागरिकाला धमकी

रत्नागिरी:- रत्नागिरी शहराजवळील शिरगाव-गायवाडी येथे जमिनीच्या वादातून एका ५८ वर्षीय व्यक्तीला ‘दाऊदचा माणूस’ असल्याचे सांगून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पुष्कर माधव दामले (वय ५८, रा. डोंबिवली) हे शुक्रवारी १३ फेब्रुवारी दुपारी कोर्टाचे काम आटोपून शिरगाव येथील आपल्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये (सर्वे नं. ६२, हिस्सा क्र. २-१) एक मर्सिडीज कार (क्र. MH-05- BM-8800) अनधिकृतपणे उभी असल्याचे त्यांना दिसले. ही गाडी अमेय दामले याच्या मालकीची असल्याचे समजते.

जेव्हा फिर्यादी आपल्या जमिनीकडे गेले, तेव्हा तिथे उभे असलेले संशयित अमेय श्रीकृष्ण दामले आणि रविंद्र वैजनाथ दामले यांनी त्यांना पाहून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अमेय दामले याने फिर्यादींना उद्देशून, “बघ मी तुझ्या जमिनीत गाडी आणून लावली, उपट काय उपटायची ते! तू माझे काही वाकडे करू शकत नाहीस, मी दाऊदचा माणूस आहे हे विसरू नको,” अशा शब्दांत धमकी दिली.

या धक्कादायक प्रकारानंतर पुष्कर दामले यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ​कलम ३२९(३), ​कलम ३५१, ३५१(२), ​कलम ३५२, ​कलम ३(५) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या जमिनीवरून संबंधितांमध्ये जुना वाद सुरू असून यापूर्वीही अशा प्रकारचे वाद झाल्याचे समजते. मात्र, थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन धमकी दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे.