Friday, August 21, 2026
spot_img
Home शैक्षणिक शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार

शिक्षक भरतीला हिरवा कंदील; ३१ हजार जागा भरणार

रत्नागिरी:- बहुप्रतीक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर वेग आला असून, राज्यातील तब्बल दीड लाख उमेदवारांच्या रिक्त जागांचे प्राधान्यक्रम पवित्र पोर्टलवर ‘लॉक’ करण्यात आले आहेत. त्यामुळे ३१ हजारांहून अधिक नव्या शिक्षकांना नियुक्तीची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, उपलब्ध जागा आणि त्या जागांसाठी प्राधान्यक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण पाहता ओबीसी आणि भटक्या जमातींच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील रिक्त पदांच्या सुमारे ८० टक्के जागांवर शिक्षक भरती करण्यासाठी शासनाने हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यानुसार २०२५ च्या ‘टेट’ परीक्षेतील उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले. सुमारे १ लाख ७० हजार उमेदवारांपैकी जवळपास दीड लाख उमेदवारांनी सहभाग घेतल्याची आकडेवारी समोर आली आहे.

या उमेदवारांची आकडेवारी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून, ‘मुलाखतीशिवाय’ भरल्या जाणाऱ्या जागांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदविला आहे. तर ‘मुलाखतीनंतर’ भरल्या जाणाऱ्या जागांसाठीही मोठ्या प्रमाणात प्राधान्यक्रम भरले गेले आहेत.

ओबीसी प्रवर्गात सर्वाधिक स्पर्धेची शक्यता
उपलब्ध जागांच्या तुलनेत उमेदवारांची संख्या पाहता ओबीसी प्रवर्गात स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. ओबीसी प्रवर्गासाठी सुमारे ३९ हजार ३१९ जागा दाखविण्यात आल्या असून, एकूण जागांमध्ये त्यांचा वाटा १२.६३ टक्के आहे. त्यामुळे या प्रवर्गातील उमेदवारांचे प्राधान्यक्रम आणि गुणवत्ता यादी महत्त्वाची ठरणार आहे.
आणखी हजारो जागांची वाढ
शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करताना पवित्र पोर्टलवर एकंदर ३० हजार रिक्त जागा दाखविण्यात आल्या होत्या. मात्र, प्रक्रिया सुरू असतानाच काही महापालिका शाळांमधील रिक्त पदे पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यामुळे राज्यातील रिक्त जागांची संख्या एक हजाराने वाढून ३१ हजार १७१ इतकी झाली आहे.

मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या शिक्षक पदांसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी प्राधान्यक्रम नोंदविला आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मुलाखतीशिवाय भरल्या जाणाऱ्या शिक्षक पदांसाठी ‘एकास एक’ या प्रमाणात उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे लक्ष आता अंतिम गुणवत्ता यादी आणि प्रत्यक्ष नियुक्तीकडे लागले आहे.
पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर प्रवर्गनिहाय आणि गुणवत्तेनुसार शिक्षक पदांसाठी शिफारसीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.