गणपती सुट्टीत पाचलमध्ये मोठी घरफोडी
पाचल:- गणपती सुट्टीच्या कालावधीत शिक्षक दाम्पत्य आपल्या मूळ गावी गेले असताना त्यांच्या राजापूर तालुक्यातील पाचल-विद्यानगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. घरातील कपाटे व तिजोरी फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ५० हजार १८५ रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने पाचल परिसरात खळबळ उडाली आहे.
पाचल येथील सरस्वती विद्या मंदिरमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या सन्नू पिरजादे आणि त्यांचे पती मुसाअल्ली गुलाब पिरजादे (वय ५६) हे तुळसवडे हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. गणपती सुट्टीच्या निमित्ताने पिरजादे दाम्पत्य १२ सप्टेंबर रोजी आपल्या मूळ गावी गेले होते. याच कालावधीत पाचल-विद्यानगर येथील त्यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला.
अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी व लाकडी कपाटांचे दरवाजे तसेच तिजोरी उघडून त्यामधील सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि रोख रक्कम लंपास केली. घरातील मौल्यवान ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पिरजादे कुटुंबीयांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव आणि पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास करण्यात आला आहे.
चोरीस गेलेल्या ऐवजात सुमारे साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे घडण, सोन्याचे ब्रेसलेट, डायमंड मंगळसूत्र, डायमंडचे कानातील टॉप्स, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे कानातले, सोन्याचा हार, कलर स्टोन्स नेकलेस, सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या पैंजणाचा जोड तसेच १२ हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ६ लाख ५० हजार १८५ रुपये असल्याचे पोलिसांत दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(क), ३३१(३) व ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून, घरफोडी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. गणपती सुट्टीच्या काळात घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.पुढील तपास राजापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहे.









