देवरुख:- शिकारीच्या उद्देशाने विनापरवाना बंदूक घेऊन फिरणाऱ्या तुळसणी येथील दोन तरुणांना देवरुख पोलिसांनी बुधवारी पहाटे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बंदूक, ७ जिवंत काडतुसे, मोटारसायकल जप्त केली. सुरज सदानंद आगरे (रा. तुळसणी आगरेवाडी, ३१), संदीप सोनू कातकर (रा. तुळसणी कातकरवाडी, ४०) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही गुरुवारी देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पहाटे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर, सचिन पवार, अभिषेक वेलवणकर हे पांगरी, घोडवली, तुळसणी भागात गस्त घालत होते. याच दरम्यान पांगरी व घोडवली गावच्या सीमेवर दुचाकीवरून दोन तरुण संशयास्पद जाताना दिसले. पोलिसांनी दोन्ही तरुणांना थांबवून चौकशी करून झडती घेतली.
सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुरज आगरे व संदीप कातकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांनाही बुधवारी अटक करून देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.









