शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात पोलिस आक्रमक

२६ दिवसात ५० जण ताब्यात; सर्वांना दंडाची शिक्षा

रत्नागिरी:- जिल्ह्यात प्रथमच शहर पोलीस स्थानकाने 26 दिवसांत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या 50 जणांना ताब्यात घेतले. त्यातील सर्वांनाच न्यायालयाने दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शहर पोलिसांच्या या विक्रमाची नोंद पोलीस अधीक्षक धनंजय कुलकण, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी घेतली आहे.

कायदा व सुव्यवस्था सुरळीत रहावे यासाठी सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला बंदी आहे. तरीही मद्यपी कायद्याचे उल्लंघन करत खुलेआम मुख्य रस्त्यासहीत टपरी, समुद्रकिनारी मद्यप्राशन करण्यासाठी बसतात. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक धनंजय कुलकण यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस निरीक्षकांना दिले होते.

वरिष्ठांच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना शहर पोलीस निरीक्षक सतिश शिवरकर यांनी 26 दिवसांत तब्बल 50 मद्यपींवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करण्याचा गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या सर्व पन्नास जणांना न्यायालयाने प्रत्येकी 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. कमी कालावधीत सर्वाधिक कारवाई करून न्यायालयात संबंधितांना दंड होण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा विक्रम शहर पोलिसांनी केला आहे.