Wednesday, October 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी वेरवली-बुद्रुक येथे वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; सोन्याच्या बांगड्या गायब, एक संशयित ताब्यात

वेरवली-बुद्रुक येथे वृद्धेचा संशयास्पद मृत्यू; सोन्याच्या बांगड्या गायब, एक संशयित ताब्यात

लांजा:- तालुक्यातील वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव परिसरात घरात एकट्या असलेल्या ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैशाली विलास हेगिष्ट्ये असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या गायब असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे चोरीच्या उद्देशाने वृद्धेच्या घरात प्रवेश करून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी लांजा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संशयावरून एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वैशाली हेगिष्ट्ये या आपली मुलगी पल्लवी विलास हेगिष्ट्ये यांच्यासोबत वेरवली-बुद्रुक येथील लाडवाडी, रामगाव येथे राहत होत्या. दसऱ्यानंतर मायलेकी मुंबईला जाण्याच्या तयारीत होत्या. दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास पल्लवी या चिकाचे दूध आणण्यासाठी वेरवली खुर्द येथे गेल्या होत्या. काही वेळाने, म्हणजेच पावणेबाराच्या सुमारास त्या घरी परतल्या असता आई वैशाली या खोलीत निपचित पडलेल्या दिसल्या. त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्याही जागेवर नसल्याचे निदर्शनास आल्याने पल्लवी यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलीस पाटील प्रभाकर कुळ्ये यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलीस उपनिरीक्षक आमोद सरंगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर, हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव आणि महिला पोलीस प्रतीक्षा राणे यांनी घटनास्थळी तपास सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या दृष्टीने आवश्यक सूचना दिल्या.

घटनेचा उलगडा करण्यासाठी फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन आणि श्वान पथकाची मदत घेण्यात आली. घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून राबविण्यात आली आहे. वैशाली हेगिष्ट्ये यांचा मृत्यू घातपातामुळे झाला की नैसर्गिक कारणाने, हे शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पल्लवी हेगिष्ट्ये यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या बांगड्या चोरीला जाणे आणि वृद्धेचा संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाबींचा एकत्रित तपास सुरू असून, ताब्यात घेतलेल्या संशयिताच्या चौकशीतून या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.